Ad will apear here
Next
आवारी गुरुजी : जन्मजात संशोधक, बहुपैलू व्यक्तिमत्त्व
नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि बहुपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे गंगाराम जानू आवारी गुरुजी. ते केवळ शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर त्यांच्यात एक संशोधक, सूक्ष्म निरीक्षक, अभ्यासक व साहित्यिकदेखील दडलेला होता. अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आवारी गुरुजींच्या जन्मशताब्दीची सांगता पाच जुलै २०१९ रोजी झाली. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यावर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख...
...........
आपला भारत देश भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे. हेच आपल्या देशाच्या समृद्धतेचे व संपन्नतेचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे. हे वैभव चिरंतन रहावे यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यांतील अनेक विभूतींनी आपले आयुष्य खर्ची घातले. सामान्य वाटणाऱ्या पण कर्तृत्वाने असामान्य असलेल्या अशा अगणित थोर व्यक्तींनी देशाच्या स्वातंत्र्ययज्ञात सहभाग घेतला होता. त्याच मालिकेतील एक ठळकपणे समोर येणारे नाव म्हणजे दिवंगत गंगाराम जानू आवारी. ‘आवारी गुरुजी’ म्हणून ते सर्वांना सुपरिचित होते. ‘वन कोंदणातील हिरा’ किंवा ‘गिरिकंदरातील झाकलेले माणिक’ असे त्यांचे वर्णन केले, तर अतिशयोक्ती होणार नाही. त्याबरोबरच ते जन्मजात संशोधकही होते. त्यांच्या १००व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे विशेष स्मरण होते. 

गंगेचे पावित्र्य व रामाचा पुरुषार्थ ज्यांच्या नावात होता, असे ते ‘गंगाराम’ होते. वडिलांच्या ‘जानू’ या नावातूनच जाणतेपणाचा वारसा त्यांच्या स्वभावात उतरलेला होता. ‘आवारी’ म्हणजे भ्रमंती करणारा अशा अर्थाने समर्थ रामदासांच्या ‘अखंड परिभ्रमण करावे’ या संदेशाचे त्यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत शब्दशः पालन केले. गुरुजींच्या एकूण आयुष्याकडे पाहिल्यानंतर याची प्रचिती येते. 

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात ‘बोरवट’ या लहानशा गावात पाच जुलै १९१९ रोजी गुरुजींचा जन्म झाला. त्या काळात हे गाव केवळ ३० ते ३५ घरांच्या वस्तीचे होते. ब्रिटिश सत्तेच्या काळात काही मोजक्याच गावात शिक्षणाची गंगा पोहोचलेली होती. त्यात सुदैवाने बोरवट हे गाव होते. त्यामुळे चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गावातच पूर्ण केले. पाचवीपासून शिक्षण घेण्यासाठी त्यांना गाव सोडावे लागले. 

अतिशय कष्टाने त्यांनी व्हर्नाक्युलर फायनलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या काळात फायनल पास केलेल्यांना प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी सहज मिळत असे. गुरुजींना आपल्या बोरवट गावात शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. त्या वेळी स्कूल बोर्डाच्या शाळा सर्वत्र होत्या. पेठ तालुक्यातील जातेगाव, बोरवट आदी गावांत ते शिक्षकाचे काम चोखपणे पार पाडत होते. परंतु तो काळ स्वातंत्र्य चळवळीमुळे देशभक्तीने भारावलेला होता. महात्मा गांधी, पू. ठक्कर बाप्पा यांच्या कार्याने अनेक तरुण प्रभावित झालेले होते. त्या वेळी नाशिक जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडलेला होता. गुरुजींची ठक्कर बाप्पांशी भेट झाली व त्यांनी दुष्काळ निवारणाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. १९४२च्या लढ्यातदेखील ते सक्रिय होते. त्यानंतर पू. ठक्कर बाप्पांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या डांग सेवा मंडळाच्या कार्यात ते प्रदीर्घ काळ सक्रिय होते. 

आवारी गुरुजी हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर त्यांच्यात एक संशोधक, सूक्ष्म निरीक्षक, अभ्यासक व साहित्यिकदेखील दडलेला होता. त्यांची या क्षेत्रातील धडपड पाहिल्यानंतर वीणा गवाणकरांनी लिहिलेल्या ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाची आठवण होते. निरीक्षण, अभ्यास, संशोधन, प्रबोधन ही सर्व अंगे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीतही ते अखंड कार्यरत राहिले. तब्बल सहाशे वनस्पतींचे औषधी गुणधर्म मुखोद्गत असणारे ते एकमेव अभ्यासक होते. म्हणूनच नाशिकच्या आयुर्वेद सेवा संघातदेखील त्यांना बोलावले जात असे. वनौषधींवर त्यांचा एक ग्रंथदेखील प्रकाशित झाला आहे.

कोकणी बोलीभाषेत वापरले जाणारे दोन हजार शब्द संकलित करून त्याचे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. रानावनातील शेकडो पशु-पक्ष्यांचे त्यांनी सखोल निरीक्षण केले होते. वाघांच्या सवयींबाबत एका इंग्रजी लेखकालादेखील त्यांनी आव्हान दिले होते. जनजाती समाजाच्या गौरवशाली परंपरा, धार्मिक सणवार, पारंपरिक पूजेतील मंत्र या सर्वांचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी आदिवासी हिंदूच आहेत हे अनेक सभा, संमेलने व ग्राम बैठकांमध्ये त्यांनी ठासून सांगितले. 

ही सर्व ज्ञानसंपदा त्यांना ज्यांच्याकडून प्राप्त झाली, ते पेठ तालुक्यातील ठाणापाडा येथील रामभाऊ सापटा गुरुजी यांचा ते गुरू म्हणून आवर्जून उल्लेख करीत. हे सर्व ज्ञान पुढील पिढीकडे संक्रमित व्हावे यासाठी त्यांची धडपड होती. त्यासाठी ते अखंड भ्रमंती करत. वैदू संमेलने, ग्राम पुजारी बैठका, आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासकांच्या भेटी, वनौषधी उपचार केंद्र, लकवा निवारण केंद्र, वनौषधी उत्पादन केंद्र आदी अनेक उपक्रमांना त्यांनी चालना दिली. 

वनवासी कल्याण आश्रमाचे ते बरीच वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मारक समितीतर्फे दिला जाणारा श्री. गोळवलकर गुरुजी पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

गुरुजींबद्दल अजून खूप काही लिहिता येईल. दिव्यत्वाची ज्योत केवळ राजमहालात किंवा सर्वानुकूल वातावरणात प्रकट होत नाही, तर ती संघर्षमय जीवन जगत रानावनात राहणाऱ्या सामान्य व्यक्तीच्या हृदयात तितक्याच तेजाने प्रकाशते, याचीच अनुभूती गुरुजींना समजून घेताना येते. म्हणूनच ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती’ असे त्यांच्या बाबतीत विनम्रपणे म्हणावेसे वाटते. जन्मशताब्दीच्या निमित्ताने गुरुजींच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन! 

- शशिकांत घासकडबी, नंदुरबार
संपर्क : ९५२७१ ५३९२५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZVACC
Similar Posts
विद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका नंदुरबार : ‘विद्यार्थी माझा पांडुरंग आणि शाळा माझी पंढरी...’ असे मानणाऱ्या शिक्षकांची संख्या आजच्या काळात कमी झाली आहे. अशा मोजक्या शिक्षकांपैकी एक असलेल्या स्नेहल गुगळे यांना यंदाचा राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक म्हणून वेगवेगळे उपक्रम त्या राबवतातच; पण २००९मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळा कलमाडी त
अवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर नाशिक : नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांमध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत विभागस्तरावर प्रथम क्रमांकाचे दहा लाखांचे बक्षीस दिंडोरी तालुक्यातील (जि. नाशिक) अवनखेड ग्रामपंचायतीला जाहीर झाले आहे
दिव्यांगांनाही घरपोच घ्यायला येणार शासकीय वाहन नाशिक : एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये यासाठी शासकीय स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आता दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी घरपोच गाड्या घ्यायला जाणार असून, त्यांचे मतदान झाल्यावर त्यांना घरी पोहोचवण्याचीही सोय केली जाणार आहे.
वार्धक्यात ज्येष्ठांना ‘मनरेगा’चा आधार नाशिक : ग्रामीण भागातील अकुशल बेरोजगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) २०१८-१९ या चालू वर्षात नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील ४८ हजार ज्येष्ठ नागरिकांना रोजगार देण्यात आला आहे. म्हणूनच ही योजना ज्येष्ठ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language